कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी अनेक राजकीय पक्षांनी जंगी सभा आणि जोरदार प्रचार केला आहे. आज या प्रचाराच्या तोफा थंडावणार असून १० मे रोजी मतदान होणार आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत कर्नाटकातील मराठी मतदारांना जाहीर आवाहन केलं आहे.
राज ठाकरेंनी सोशल मीडियावर लिहीलेल्या पोस्टमध्ये पक्ष कोणताही असेल तरी मराठी उमेदवारालाच मतदान करण्याचे अवाहन केले आहे. राज ठाकरे काय म्हणाले आहेत?राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा असा अग्रह व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.”
“तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती याचा आदर केलाच पाहिजे, या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
कर्नाटकातल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत. सीमाभागातील लोकांना 10 मे ला संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
