पंतप्रधान आवास योजना घोटाळ्याप्रकरणी; छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ‘ईडी’ची नोटीस

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेत तथाकथित घोटाळ्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली आहे. तर पाण्डेय यांना आज मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी देखील ईडीकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी याच प्रकरणात महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांची देखील मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र निविदा प्रक्रियेत कंपनीकडून घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात सुरवातीला पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या कंपन्यांना काम मिळाले होते, त्या कंपनीशी संबंधित लोकांवर ईडीने एकाचवेळी 9 ठिकाणी छापेमारी केली होती. पुढे या प्रकरणात ईडीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मुंबई कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी केली. दरम्यान आता याच प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली आहे. तर पाण्डेय आज मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.