उद्धव ठाकरेंनी ढापला मुंबईच्या महापौरांचा बंगला, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप

हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नावाखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या महापौरांचा बंगला ढापल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. रत्नागिरीत झालेल्या जाहीर सभेत राज यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ५०० कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या या बंगल्याचा ठाकरे कुटुंबाकडून खासगी वापर होत आहे. दादरमध्ये असलेला हा महापौर बंगला बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाला हस्तांतरित करताना अडीच एकरांचा परिसरासाठी केवळ एक रुपया भाडं आकारण्यात आलं आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे मुंबईच्या महापौरांच्या बंगल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सात वर्षांपूर्वी महापौर बंगल्याचा वाद चांगलाच पेटला होता. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगला नाही तर साहेब जिथं राहात होते तो मातोश्री बंगलाच योग्य असल्याचं मत त्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनी मांडलं होतं.बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर असून त्यांचं मुंबईत भव्य स्मारक व्हावं अशी इच्छाही आहे; पण या स्मारकासाठी ऐतिहासिक महापौर बंगल्याचा बळी दिला जाऊ नये. बाळासाहेबांचं वास्तव्य ज्या वास्तुत होतं ते मातोश्री निवासस्थानच त्यांचं स्मारक म्हणून योग्य राहील. बंगला ही ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे ती स्मारकाला देण्यात येऊ नये, अशी भूमिका या पक्षांनी घेतली होती.

मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगलाच हवा असा हट्ट धरला होता. खरं तर या महापौर बंगल्याला पुरातत्त्व विभागाकडून ‘ब’ दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे या भागात स्मारक बांधण्यासाठी जागा अपुरी पडत होती तसंच बंगाल्याच्या परिसरात कोणताही बदल करणं शक्य नव्हतं. तरीही आपलं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला खासगीच राहावा यासाठी उद्धव ठाकरे हट्टाला पेटले होते.

बाळासाहेबांवरील प्रेम आणि आदरापोटी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंगला स्मारकासाठी देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या मागणीप्रमाणे भरीव तरतूदही केली होती. या स्मारकासाठी जो ट्रस्ट तयार करण्यात आला तो जवळपास शिवसेनेचा खासगी ट्रस्ट असल्यासारखा आहे, म्हणजे अप्रत्यक्षरित्या शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता ठाकरे कुटुंबाने हडप केली, असा आरोप केला जातोय.बाळासाहेबांचं स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी त्यांची भावना होती. मात्र ठाकरे कुटुंबाने खासगी मालमत्ता असल्यासारखा या बंगल्याचा वापर सुरू केला आहे.

बाळासाहेबांच्या नावाने मुंबईच्या महापौर बंगला ठाकरे कुटुंबाने ढापला असून ते तो प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखा वापरत आहेत. पेंग्विनचं फोटो शूट, संध्याकाळच्या मीटिंग/कार्यक्रम याच बंगल्यात होतात. मुंबईकरांच्या प्रॉपर्टीचा दुरुपयोग होतोय, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी केला होता. बाळासाहेबांचे पुतणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच हा विषय पुन्हा ऐरणीवर आणला आहे.