सोन्याचा चमचा घेऊन काही लोकं आले आहेत, कॉन्ट्रॅक्टरची भाषा त्यांना माहीत आहे; श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

पावसाळ्यात मुंबई आणि रस्त्यांवर असणारे खड्डे यांचा मोठा प्रश्न निर्माण होतो. यावरून आता आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांमध्ये चांगलीच खडाजंगी जुंपली आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईत रस्ते काँक्रीटीकरणात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसेच शिंदे-फडणवीस सरकार हे बिल्डर आणि कंत्राटदारांचं सरकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंनी केलेल्या या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे.

कॉन्ट्रॅक्टरची भाषा काही लोकं करत आहेत. सोन्याचा चमचा घेऊन काही लोकं आले आहेत. त्यांना बरोबर रेट माहीयेत. कॉन्ट्रॅक्टरची भाषा त्यांना माहीत आहे. कारण 25 वर्षे त्यांनी तेच केले आहे. मला अजून उलगडायला लावू नका, असा इशारा श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, “महाराष्ट्राची एक संस्कृती राहिली आहे. टीका करतानाही प्रत्येकजण पातळी राखत होता. मात्र, गेल्या १० महिन्यांपूर्वी अडीच वर्षाचं सरकार गेलं. काहीच काम न करणारं सरकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उलथवलं गेलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यातून विरोधक अद्याप सावरलेले नाहीत.”

“निवडणूक आयोगाचा निर्णय आमच्या बाजूने लागला आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातही सत्याच्या बाजूने निकाल लागेल. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाची धास्ती वगैरे काहीही नाही. तांत्रिकदृष्ट्या ज्या गोष्टी करायला हव्या त्या आम्ही तंतोतंत बरोबर केल्या आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल,” असं मत श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केलं.