संजय राऊत यांनी नैतिकता पाळून देवळात जाऊन ध्यान धारणा करावी – शहाजीबापू पाटील

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक भन्नाट ट्वीट केलं होतं. सत्तासंघर्षावरील निकाल आपल्या बाजूने लागेल असं संजय राऊतांना वाटत होतं. परंतु तसं झालं नाही. त्यामुळे आता संजय राऊतांवर सत्ताधाऱ्यांकडून टीका सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या स्टाईलमध्ये ट्वीट केलं होतं. त्यावर आता खुद्द शहाजीबापूंनी उत्तर दिलं आहे.

सुप्रीम कोर्टाने लोकशाही टिकवाण्याचे काम केले त्याबद्दल कोर्टाचे आभार मानतो, असं म्हणत आमदार शहाजीबापूंनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. सुप्रीम कोर्टाने केवळ सरकारच नव्हे तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घशात जाण्यापासून वाचवली, असं सुद्धा शहाजीबापू म्हणाले.

संजय राऊत यांनी नैतिकता पाळून आता राज्याच्या राजकारणातून बाजूला जात कोठेतरी मंदिरात जाऊन ध्यान धारणा करावी. असा सल्ला पाटील यांनी राऊतांना दिला आहे. महाराष्ट्रात पेटवायचे काम काडेपेटी व रॉकेलचा डब्बा घेऊन राऊत हे करत आहे. राऊतांना सर्व पक्षांनी राजकारणातून बाजूला काढलं पाहिजे. उद्धव ठाकरेंना राहिलेली व उरलेली शिवसेना वाढवायची असेल तर पहिला राऊत यांना बाजूला काढलं पाहिजे. नाहीतर उद्धव सेना ही संपल्याशिवाय राहणार नाही.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालामुळं शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. पण सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालामुळे शिंदे सरकार स्थिर झाले आहे. त्यामुळे लवकर राज्यमंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होईल, असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं आहे.