राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. यात महाराष्ट्रात असणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे. दिल्ली येथील प्रगती मैदानामध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यामध्ये लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा लिगो-इंडिया, हिंगोली, टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबईचा प्लॅटिनम ज्युबिली ब्लॉक या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे.
राष्ट्राला समर्पित केलेल्या प्रकल्पांमध्ये मुंबई येथील फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा तसेच नवी मुंबई येथील नॅशनल हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा, रेडिओलॉजिकल रिसर्च युनिट, तसेच महिला आणि लहान मुलांच्या कर्करोग रुग्णालयाची इमारत यांचा समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्री यांनी भारतामध्ये अलिकडच्या काळात झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले तसेच स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाणेही जारी केले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या आणि मे 1998 मध्ये पोखरण चाचणी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या सन्मानार्थ ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस नवीन आणि वेगळ्या संकल्पनेसह साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना ‘स्कूल टू स्टार्टअप्स- इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ अशी आहे.
