राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालात शिंदे सरकारला अभय मिळालं आहे. मात्र, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकांवर कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहे. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्याच बाजूने निकाल आल्याचे दावे दोन्ही बाजूने होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली आहे.राज ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याप्रकरणी मला न्यायालय किंवा पोलिसांकडून नोटीस येतात. त्यातील त्यांची भाषा वाचल्यावर आपल्याला सोडलंय की अटक केली हेच कळत नाही. इतकी ती भाषा गुंतागुंतीची असते.”
त्यांनी सांगितलं सगळी प्रक्रिया चुकली, मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधिमंडळातील गट पक्ष समजला जाणार नाही, बाहेरचाच पक्ष म्हणून समजला जाईल. ही गोष्ट झाल्यावर निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं काय होणार? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारेने राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे, असं विचारलं असता, उद्धव ठाकरेंचे काय प्रश्न आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला त्यांचे प्रश्न विचारू नका. तो वेगळा पक्ष आहे. माझा वेगळा पक्ष आहे. त्यांचे प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवू नका, असं राज ठाकरे म्हणाले.
