मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी विचार सोडला, नीती सोडली, पक्षही सोडला ते कोणत्या नाकाने नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत? देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्या मागणीला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांनीही उत्तर दिलं. त्यापाठोपाठ आजही उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि राजीनाम्याची मागणी केली. आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीस यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना या मुद्द्यावर विचारले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिप्रश्न करत म्हटले की मग पवार साहेबांचा आणि नैतिकतेचा संबंध आहे का ?, आता जर पवार साहेबांनी भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर मग कठीणच जाईल. त्यासाठी इतिहासात जावे लागेल वसंतदादांचं सरकार कसं गेलं ? इथपासून सुरुवात होईल, जाऊ द्या. ठीक आहे ज्येष्ठ नेते आहेत. बोलत असतात फार लक्ष द्यायचं नसतं, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरही त्यांनी भाष्य केले. न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे सर्व अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. त्यासाठी वेळही सांगण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर स्पीकरवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते फ्री अँड फेअर प्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की स्पीकर कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडतील. सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष निष्णात वकील आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे जे कायद्यात आणि संविधानात आहे आणि जे सुप्रीम सांगितले आहे त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष योग्य वेळी योग्य निर्णय करतील.

नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकारच नाही. जे मोदींचा फोटो लावून निवडून आले. निवडून आल्यावर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी विचार सोडला, नीती सोडली, पक्षही सोडला ते कोणत्या नाकाने नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत?” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा लगावला. तसंच निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने आला आहे असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी ढोल बडावावेत असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.