समीर वानखेडेंवर सीबीआयकडून गुन्हा दाखल, मुंबईतल्या घरावर छापा

आर्यन खान प्रकरणात चर्चेत आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांच्या संबंधित सात ठिकाणी सीबीआयने छापेमारी केल्याची माहिती आहे. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे चर्चेत आले होते. आता त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने दाखल केला आहे.

समीर वानखेडे यांचं अंधेरीमधील घर आणि मुंबईतल्या काही भागांमध्ये सीबीआयची छापेमारी सुरू आहे. आर्यन खान प्रकरणामध्ये समीर वानखेडे चर्चेत आले होते. समीर वानखेडेंच्या परिसरांवर आर्यन खान क्रूज प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने छापेमारी केली. सीबीआयने सांगितले, की दिल्ली, मुंबई आणि रांचीसह जवळपास 19 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. ही छापेमारी अजूनही सुरुच असल्याचे सांगण्यात आले.

समीर वानखेडेंवर दाखल करण्यात आलेला भ्रष्टाचाराचा गुन्हा हा आर्यन खान प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी सीबीआयने पाच जणांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यामध्ये समीर वानखेडे यांच्यासह दोन अधिकारी आणि इतर दोन खासगी व्यक्तींचा समावेश आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि त्यामधील 50 लाख रुपये स्वीकारण्यात आले होते अशी माहिती दिली आहे. या प्रकरणात वानखेडे यांच्याशी संबंधित 29 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे.