राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाना साधला होता. तसेच भाजपने मोठी जबाबदारी दिली तरी एनसीपीवर काही परिणाम होणार नाही. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत हा भाजपला अनुभव आला आहे असे म्हटलं होते. ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त नऊ मे रोजी साताऱ्यात असताना बोलले होते. त्यावर आता उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ‘पवार साहेब हे वयाने मोठे आहेत. त्यांचे विचार आणि वाचनही मोठे आहे. त्यामुळे सातारा लोकसभेच्या मागील निवडणूक निकालाबाबत ते म्हणाले ते योग्य आहे. पण आमच्या घराण्यात विश्वासघात करण्याची परंपरा नाही. निवडणुकीत कोण काय करते हा भाग वेगळा आहे. तर मी राजीनामा दिला, पण मागे घेतला नाही. त्यांनी दिला आणि मागे घेतला का? ते त्यांना विचारा असेही ते म्हणाले.
‘लोकशाही आहे, कोणी कुठूनही उभे राहू शकते. प्रत्येकाला अधिकार आहे. अजून लोकसभा निवडणूक लांब आहे. ज्या त्यावेळी कोण विरोधात आहे, त्यावर ठरवू’, असे उत्तर सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून तयारी सुरू असून तुमच्या विरोधात रामराजेंची उमेदवारी असेल, तर तुम्हाला आव्हान वाटेल काय? या प्रश्नावर उदयनराजेंनी उत्तर दिलं. कर्नाटकची पुर्नरावृत्ती महाराष्ट्रात होईल, असे विरोधकांकडून सांगितले जात आहे. यावर उदयनराजे म्हणाले, ‘एका राज्यात जे घडले त्याचा परिणाम दुसऱ्या राज्यात घडेल असे नाही. महाराष्ट्रात निवडणूक लागल्यावर पाहू’
इतके वर्षे तुमच्याकडे सत्ता होती. त्यावेळी का कामे झाले नाहीत? उलट आमच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आली की सर्व कामे झाली. दुसऱ्याला नावे ठेवण्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही; पण त्यांच्या नावे ठेवण्यामुळे आम्हाला दृष्ट लागणार नाही. मंत्रिमंडळ विस्तारात आमदार शिवेंद्रसिंहराजेंना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर ते म्हणाले, ‘याबाबत मला माहिती नाही, माझी त्यांच्या मंत्रिपदाला आडकाठी नाही.’
