शिवडी ते न्हावा या 22 किमी लांबीचा 6 पदरी दक्षिण मुंबईला रायगडशी जोडणारी अखंड व थेट कनेक्टिव्हिटी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक समुद्र सेतूच्या निर्मितीसाठी 17 आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजे 1,70,000 टन स्टीलच्या सळयांचा वापर केला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई पार बंदर प्रकल्पाची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली. यावेळी बोलताना जगातील 10 व्या क्रमांकाचा व भारतातील सर्वाधिक लांबीच्या समुद्र सेतूची माहिती देताना फडणवीस म्हणाले, 17 आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजे 1,70,000 मे. टन स्टीलच्या सळयांचा वापर करण्यात आला आहे. पृथ्वीच्या व्यासाच्या 4 पट म्हणजे 48,000 कि. मी लांबीच्या प्रिस्ट्रेसींग वायर्सचा वापर झाला आहे. म्हणजे या वायरची लांबी इतकी आहे की पृथ्वीला चार वेळा प्रदक्षिणा घालता येईल.’स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’साठी वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट म्हणजे 9,75,000 घनमीटर काँक्रीटचा वापर यासाठी करण्यात आला आहे.
‘बुर्ज खलिफा’ च्या 35 पट उंचीच्या म्हणजेच सुमारे 35 किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा वापर केला गेला आहे. मुंबई व नवी मुंबई व रायगड यांना जोडणाऱ्या या सेतुमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई गोवा महामार्ग यामधील अंतर कमी होणार आहे. यामुळे इंधन, वाहतूक खर्च व वेळेत 1 तासाची बचत होणार ओपन रोड टोलिंग सिस्टिम असलेला देशातला हा पहिलाच प्रकल्प आहे.
