संसद भवन 140 कोटी लोकांच्या आस्थेचे मंदिर आहे. त्याच्या उद्घाटनावर बहिष्कार घालणे म्हणजे लोकशाहीला नाकारण्यासारखे आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देशातील वीस विरोधी पक्षांनी नवीन संसद भवन उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. त्यांना जाब विचारताना फडणवीस म्हणाले,इंदिरा गांधीजींनी ज्यावेळी संसदेच्या ॲनेक्स बिल्डिंगचे उद्घाटन केले तेव्हा तुम्ही बहिष्कार का नाही घातला? इंदिराजींनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचे उद्घाटन केले, तेव्हा ते राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आले नाही?राजीव गांधीजी यांनी संसदेच्या ग्रंथालयाचे उद्घाटन केले, तेव्हा राष्ट्रपतींची आठवण का नाही झाली? एवढेच नाही तर तामिळनाडूमध्ये तिथल्या विधानभवनाचे उद्घाटन करताना राज्यपाल नव्हते. सोनियाजी होत्या. नितिशकुमारजींनी बिहार विधानभवनाच्या सेंट्रल हॉलचे उद्घाटन केले. त्यावेळेस बहिष्कार का नाही घातला? त्यावेळी सांगायचे होते राज्यपालांनी उद्घाटन करावे, नितिशजींनी करू नये.
यूपीएचे सरकार असताना मणिपूरच्या इम्फाळमध्ये मनमोहनसिंग आणि सोनीयांजींनी तिथल्या विधानभवनाचे उद्घाटन केले. तेव्हा ते तिथल्या राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आले नाही? असा सवाल करत फडणवीस म्हणाले, तरूण गोगोईनी 2014 साली आसामच्या विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांना निमंत्रितदेखील केले नाही. 2014 मध्ये झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांना निमंत्रित देखील केले नाही. 2018 मध्ये आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांच्या हस्ते का नाही केले? 2020 मध्ये सोनियाजींनी छत्तीसगडच्या विधानभवनाचे भूमिपूजन केले. सोनियाजी त्यावेळी कोणत्याही वैधानिक पदावरच नव्हत्या. त्या केवळ एक संसद सदस्य होत्या. मग त्या वेळी या सगळ्या पक्षांनी बहिष्कार का टाकला नाही. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या विधानसभेच्या ज्युबिली मेमोरियल बिल्डिंगचे उद्घाटन केले. राज्यपालांना साधे निमंत्रणही दिले नाही. अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले. उपराज्यपालांना साधे निमंत्रणदेखील दिले नाही. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांना निमंत्रण देखील दिले नाही.
फडणवीस म्हणाले, ज्यावेळी हे लोक उद्घाटने करतात, त्यावेळी लोकतांत्रिक. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी रेकॉर्ड वेळेत नवीन संसद भवन तयार केले, त्याचे उद्घाटन होत आहे. एक लक्षात आणून देतो. आत्ताचा जे संसद भवन आहे, तो कौन्सिल हॉल होता. पहिल्यांदा देशात पूर्ण क्षमतेचे संसद भवन तयार करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मोदीजी करत आहेत तर त्याच्यावर बहिष्कार का? हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर आहेत. सत्तेचे सौदागर आहेत. मोदीजींचा मुकाबला करू शकत नाहीत, म्हणून सगळे एकत्र आले आहेत. पण माझा यांना सवाल आहे, एवढी उदाहरणे मी दिली. त्यावेळी बहिष्कार का टाकला नाही, याचे पहिल्यांदा उत्तर द्या. हे लोकशाहीविरोधी लोक आहेत.
