उद्धव ठाकरे यांचे कुटुंब फुकटावर राहणारे आहे. परफ्युम, एसी, गाड्यांच्या मेंटेनन्स पासून घरातल्या राशनलाही खर्च करत नाही असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला. मातोश्री 2 बांधली. त्याची गरज होती का? असा सवालही त्यांनी केला.
मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, नव्या संसद भवनाची गरज आहे का?, असा प्रश्न देशाच्या संविधानिक संस्था व पदाविरुद्ध रोज सकाळी गरळ ओकणारे संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बीएमसीच्या पैशाने नवी मातोश्री, मातोश्री २ बांधली. त्याची गरज होती का?, जुन्या मातोश्रीत ते का नाही राहत?, याचे उत्तर प्रथम त्यांनी द्यावे आणि नंतर नव्या संसद भवनाबद्दल प्रश्न विचारावे.
देशाला कायम अस्थिर ठेवायचा प्रयत्न जसा शहरी नक्षली करतात त्याच दिशेने संजय राऊत यांचा प्रवास सुरू आहे. येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण होत आहे. त्यावर संजय राऊत हे टीका करत आहेत. सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष असताना तेव्हाच्या एनडीएने, ज्यामध्ये उद्धव ठाकरेही होते, एकमताने ही इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता. आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा सर्व देशांत मोदींना जो मान मिळतोय ते यांना बघवत नाही. त्यामुळे राऊत अशी टीका करत असल्याचे राणे म्हणाले.
