माजी मंत्री राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांच्यातील राजकीय वाद वाढलेला असतानाच एक खळबळजनक घटना घडली आहे. आ. शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यास धमकी दिल्याप्रकरणी जामखेड पोलस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धमकी देणारा संशयित हा आमदार रोहित पवार यांचा समर्थक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

जामखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आमदार राम शिंदे यांना एका युवकाने धमकी दिली. त्याबाबतची फिर्याद अमित चिंतामणी यांनी पाेलिस ठाण्यात दिली. यामध्ये शिवीगाळ करणे, दोन गटात तेड निर्माण करणे, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सागर गवसणे या संशियताच्या विरोधात (कलम 504, 505-2, 506-2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान धमकी देणारा सागर गवसणे हा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा समर्थक असल्याचे समजते. गवसणे याने समाज माध्यमातून लाईव्ह करीत धमकी दिली. तसेच धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यामध्ये त्याने आमदार राम शिंदे आणि अमित चिंतामणी या दोघांना धमकी दिली. यापुर्वी देखील सागर गवसणे याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली.

फिर्यादी चिंतामणी यांच्या मोबाइलवर एका नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने तुम्ही राम शिंदे यांच्या जवळचे आहात त्यांना जुळवून घेण्याचे सांग नाहीतर पाहून घेईन असे म्हणाला. त्यानंतर काही वेळाने मी राम शिंदे यांना हा प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनी मला सांगितले की सागर गवसणे नावाच्या व्यक्तीने याने फेसबुक लाइव्ह करत धमकी देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.