लोकांची कामं करून घ्यायची असतील तर मुख्यमंत्र्यांना भेटावंच लागणार – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अलिकडच्या काळात अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रकाश आंबेडकरांचं कौतुक करत म्हणाले होते की, “बाळासाहेब कधी कधी चांगले सल्ले देतात.” आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या सल्ल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची भाजपा-शिंदे गटाशी जवळीक वाढत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मुळात काही महिन्यांपूर्वी वंचितने शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर युती केली आहे. त्यामुळे आंबडेकर नेमके कोणत्या बाजूला आहेत असा प्रश्न त्यांचे राजकीय विरोधक उपस्थित करत आहेत.

त्यानंतर आज प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एक मोठे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर वाढलेल्या भेटीगाठी आणि फडणवीस यांनी केलेले कौतुक यांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आंबेडकर म्हणाले, ते मुख्यमंत्री आहेत आणि आपल्याला लोकांची कामे करून घ्यायची असतील तर मुख्यमंत्र्यांना भेटावच लागणार आहे.ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अशा प्रकारच्या चर्चा होत असतील तर त्याला काहीच अर्थ नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांना म्हणालो होतो, तुम्ही बाहेर या, आम्ही तुमच्याबरोबर बसायला तयार आहोत. परंतु, भाजपसोबत बसणं कठीण आहे, त्यांच्यासोबत आम्ही बसणारच नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

दरम्यान, मध्यंतरीच्या काळात प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावरून वेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा आंबेडकरांना भाजपात येण्याची ऑफर दिली होती. त्याचीही चांगलीच चर्चा झाली होती. प्रकाश आंबेडकर यांनी इकडं तिकडं फिरू नये. मी तुम्हाला भाजपाबरोबर घेऊन जातो असं आठवले सोमवारी म्हणाले होते.