राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘नमो महासन्मान शेतकरी निधी योजने’वर आज मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना वर्षाला अतिरक्त सहा हजार रुपये देणार आहे.
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेद्वारे वर्षाला 6 रुपये मिळतात. यासोबत आता नमो शेतकरी योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांना अतिरक्त सहा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत. केंद्र व राज्य असे दोन्ही मिळून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.केद्रांच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनात केली होती. त्यानुसार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दोन्ही मिळून दरवर्षी १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. राज्यातील १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मे अखेरीस किंवा जुलैमध्ये या योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. टॅक्स भरणारे, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी शेतकरी यांच्या व्यतिरिक्त सर्वांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे, 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या ज्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो, तेच बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करायचा आहे. अजूनही राज्यातील १२ लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करण्यात आलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी सर्वात आधी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करून घ्यायचे आहे. नाहीतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
