एक ‘मातोश्री’ असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?- केशव उपाध्ये

नव्या संसद भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. संसदेची नवीन इमारत बांधणाऱ्या कामगारांचा पंतप्रधान मोदींनी सन्मान केला. जवळपास 971 कोटी रुपये खर्चून बांधलेले, नवीन संसद भवन भारताच्या प्रगतीचे प्रतीक आहे आणि सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. नवी संसद भवन त्रिकोणी आकारात बांधण्यात आली आहे. मात्र सामनाच्या अग्रलेखातून यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेची इमारत स्वतःसाठी बांधली नाही. तर भारताच्या भविष्याचा विचार करून ती देशासाठीच बांधली आहे. एक ‘मातेश्री’ असताना ‘मातोश्री -2’ बांधला तेव्हा कोणता विचार होता? असा सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. सामनाच्या अग्रलेखावर त्यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. नव्या संसद भवन उद्घाटनच्या वेळी झालेले सर्व विधी हे आपल्या महान परंपरेचा आणि आध्यात्मिक वारसा जपणारे होते. संगोलला काठी म्हणणाऱ्या लोकांना ते समजण्याची अपेक्षा नसल्याचे मत देखील केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात त्यांनी घराणेशाही आणि राजेशाही यावरुनही ठाकरे परिवारावर टीका केली.

केशव उपाध्ये म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेची इमारत स्वतःसाठी नाही बांधली. भारताच्या भविष्याचा विचार करून देशासाठीच बांधली आहे. एक ‘मातोश्री’ असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता? संसद भवन उद्घाटनावेळी झालेले सगळे विधी आपल्या महान प्राचीन परंपरेचा अध्यात्मिक वारसा जपणारे होते. ‘सेंगोल’ची काठी करणाऱ्या लोकांना ते समजण्याची अपेक्षा नाहीच. घराणेशाही, एका कुटुंबाची सत्ता उलथून टाकल्याच्या रागातून टीका करणे योग्य नाही.’