उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी कोर्टाच्या निकालाबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की,ठाकरे गट किंवा एनसीपी असेल त्यांना माहित आहे की त्यांचा पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना निराश वाटू नये म्हणून अशा प्रकारची वक्तव्यं केली जात आहेत. पण अशा प्रकारच्या वक्तव्यांनी न्यायालयाचा कुठलाही निर्णय बदलत नसतो.
संपूर्ण ठाकरे गट तीन ते चार लोकांमुळे अस्वस्थ आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. आज सामनाच्या अग्रलेखात शिंदे गटाचा उल्लेख भाजपाने खुराड्यात पाळलेल्या कोंबड्या आणि १३ तुर्रेबाज कोंबडे असा खासदारांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच मिंधे गटात २२ आमदार आणि नऊ खासदार अस्वस्थ आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाविषयी सूचक वक्तव्य केलं आहे.
ठाकरे गटच अस्वस्थ आहे.तीन-चार लोकांमुळे तिथे अस्वस्थता आहे. ठाकरे गटा संदर्भात मी बोलण्याऐवजी तुम्हाला भविष्यात कळेल,असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.प्रत्येक पक्षाला आपला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं असेल. त्याबद्दल काय बोलणार? असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. १९ जून रोजी शिवसेना वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे तर शिवसेनेनं वेगळी तयारी केली आहे. त्यावरुन प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं.
