रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार; सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्यात १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. मंगळवार, ६ जून रोजी देखील सकाळी ८.३० वाजता रायगड किल्ल्याच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय, १ जून ते ७ जून या काळात गेटवे ऑफ इंडिया येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. १ जून रोजी ‘जाणता राजा’ हे महानाट्य, २ जून रोजी राजस्थानी लोककला, ३ व ४ जून रोजी महाराष्ट्राची लोककला तसेच ५ ते ७ जून दरम्यान गोवा व गुजरात या राज्यातील लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या सोबतच १ ते ७ जून या कालावधीत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा दि.2 व 6 जून 2023 रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. या सोहळ्यास येणाऱ्या शिवभक्त जनतेसाठी अत्यावश्यक सेवा, सोयीसुविधांसह त्यांच्या स्वागत आणि तत्पर सेवेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या शिवराज्याभिषेकाला शासनाचे प्रतिनिधी म्हणून केंद्र आणि राज्य शासनाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला होणारी शिवभक्तांची प्रचंड गर्दी पाहता रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने 33 समित्यांचे गठन करण्यात आले आहे.

सोहळ्याला होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम, वॉकी टॉकी, हॅम रेडिओ, पोर्टेबल साऊंड, सर्च लाईट, वीज अटकाव यंत्रणा आदि साधन-साहित्यांची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. यासह सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण सोहळ्यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येत आहे.