कर्नाटकातील चामराजनगरमध्ये हवाई दलाचं विमान कोसळलं, दोन्ही पायलट सुरक्षित

कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील बोगापुरा गावाजवळ भारतीय हवाई दलाचं ट्रेनिंग विमान कोसळलं. नियमित उड्डाणानंतर हे विमान काहीच वेळानंतर एका शेतात कोसळलं, जमिनीवर पडताच या विमानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि काही मिनिटात आग विझवली. सुदैवाने दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर उड्या मारल्या होत्या.

आयएफ अधिकाऱ्यांनी सांगितले – या घटनेची माहिती मिळताच हवाई दलाचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकही तिथे उपस्थित आहेत. अपघातानंतर विमानाच्या काही भागांना लागलेली आग विझवण्यात येत आहे.रेडबर्ड एव्हिएशनच्या 2 आसनी प्रशिक्षण विमानाची मंगळवारी कर्नाटकातील बेळगावी येथील सांब्रा विमानतळाजवळ आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. उड्डाणावेळी तांत्रिक बिघाड झाल्याने ही लँडिंग करण्यात आली. त्यात दोन्ही पायलट किरकोळ जखमी झाले. त्यांना हवाई दलाच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

या घटनेची माहिती देताना भारतीय हवाई दलातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हवाई दलाचं ट्रेनिंग विमान आज दुपारच्या सुमारास कोसळलं. यामध्ये एक महिला पायलटही होती. दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. अपघाताचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. वरिष्ठांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.