हे डबल इंजिनचं सरकार, ज्याला बसायचं त्याने बसावं, मात्र ड्रायव्हर मी आहे – रावसाहेब दानवे

भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे नेहमी आपल्या वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांची भाषणे ही अस्सल खुमासदार शैलीतील असतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांची कायम चर्चा होत असते. आता त्यांचे आणखी एक विधान चर्चेत आले आहे. यावेळी ते जालना येथे बोलत होते. त्यांनी बोलताना काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना चांगलेच चिमटे काढले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला होता.

आज जालना नगर परिषदेच्या अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज उद्यानात १५० फुट उंच राष्ट्रीय ध्वज आणि मोती तलाव चौपाटीवर रेल्वे इंजिन (लोकोमोटीव्ह) बसविण्याचा भुमिपुजन सोहळा आज दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला. याच कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

दानवे यांनी जालना शहरात चांगला विकास केला. मात्र त्यांनी रेल्वे इंजिनसोबत आमच्यासारखा एक डब्बाही घेऊन फिरावे, असे गोरंट्याल यांनी म्हटले. यावर दानवे यांनी हे डबल इंजिनचं सरकार, ज्याला बसायचं त्याने बसावं, मात्र ड्रायव्हर मी आहे, असे सांगत एकप्रकारे इशाराच दिला आहे.गोरंट्याल हे 2019 साली शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांना पराभूत करुन आमदार झाले.

दरम्यान, 2019 च्या लोकसभेसाठी अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मागितली होती. तेव्हा रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यात बराच संघर्ष झाला होता. यानंतर दोघांमधील वाद मिटला होता. पण विधानसभेला अर्जुन खोतकर यांचा कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला. सध्या अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत आले आहे.