जे. जे. रुग्णालयात राजीनामासत्र; ‘मार्ड’च्या आरोपांनंतर डॉ. तात्याराव लहाने, यांच्यासह इतर नऊ डॉक्टरांचा पदत्याग

मुंबईतील सुप्रसिद्ध जे जे रुग्णालयात विविध पदांवर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक राजीनामे दिले आहेत. प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने रागिणी पारेख यांच्यासह नऊ वरिष्ठ डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले आहेत. यामुळे वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी सविस्तर प्रसिद्धी पत्रक जारी करत आपली भूमिका मांडली आहे.

जेजे रुग्णालयात नेत्रविकार विभागात डॉक्टर, प्राध्यापक, विभाग प्रमुख हे विद्यार्थ्यांना त्रास देत असून त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी करत जेजे मार्डने आजपासून काम बंद आंदोलन सुरु केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपामुळे व्यथित होऊन राजीनामा दिल्याचे डॉ. लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी राजीनामे देताना सांगितले

डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमाचे उल्लंघन करीत असून, निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यापासून दूर ठेवणे, शैक्षणिक अनियमितता, शैक्षणिक आणि संशोधन उपक्रम, निवासी डॉक्टरांवर अश्लील भाषेत टिप्पणी आदींमुळे जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. डॉ. पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने यांची बदली करावी, तसेच आवश्यक पदांवर प्राध्यापकांची लवकरात लवकर भरती करावी, अशा मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या आहेत.

‘मार्ड’ने केलेले आरोप खोटे असल्याचा दावा करीत डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्याचबरोबर विभागातील अन्य आठ डॉक्टरांनीही राजीनामा दिला आहे. त्यात डॉ. शशी कपूर, डॉ. दीपक भट, डॉ. सायली लहाने, डॉ. प्रीतम सामंत, डॉ. स्वरांजित सिंग भट्टी, डॉ. आश्विन बाफना आणि डॉ. हमालिनी मेहता यांचा समावेश आहे.