छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र – सरसंघचालक मोहन भागवत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र असे मत संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांनी दिल्लीला खडावून सांगितलं की हिंदू-मुस्लीम दोघांना देवांने निर्माण केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्ग तृतीय वर्षाचा आज समारोपाचा कार्यक्रम नागपुरात पार पडला. नागपूर संघाच्या रेशीम बाग कार्यालयात गेले 25 दिवस तृतीय वर्षासाठीचे संघ शिक्षा वर्ग सुरू होते. यात देशभरातील 686 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. समारोपाच्या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सरसंघचालकांनी पुढे म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे राष्ट्राच्या (भारताच्या) स्वत्वची घोषणा केली होती, आणि आम्ही इथे हिंदवी स्वराज्य स्थापन करू असे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी सहकारी गोळा केले, प्रेरणा दिली, संस्कार दिले, जुनी मूल्ये जागृत केली. गोवध थांबविले, मातृभाषेत राज्याचे व्यवहार सुरू केले, नौदल तयार केले, इतर धर्मांत गेलेल्यांना परत हिंदू धर्मात घेतले, काशीचा मंदिर तोडणाऱ्या औरंगजेबाला खरमरीत पत्र पाठवत तुम्ही हे थांबविले नाही तर मला उत्तरेत तलवार घेऊन यावे लागेल असा इशारा महाराजांनी दिला.

मोहन भागवत म्हणाले, भाषा, संप्रदाय याबाबत वाद आहेत, त्याविरोधात उभे राहिले पाहिजे. मात्र आपण आपसात भांडत आहोत. काही राजकीय पक्ष याला हवा देण्याचे काम करत आहे, त्यांनी करावे. मात्र आपल्या भांडणं होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. देशाच्या अखंडतेसाठी प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे. मात्र ते काही लोकं ते करत नाही, असे मोहन भागवत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, काही संप्रदाय बाहेरून आले, त्याच्याशी आपले वाद झाले, ते निघून गेले. मात्र जे आता आपल्यासोबत आहेत त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.