पुणे लोकसभेची जागा काँग्रेस लढवणार; मविआला टाळत नाना पटोलेंचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला असला तरी कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची पुण्याची जागा काँग्रेसनेचे लढविण्याची भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची ताकद कशी आहे, हे मुंबई येथे शनिवारी (३ जून) होणाऱ्या बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर लवकरच निवडणूक लागणार आहे. पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असताना काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

पुणे लोकसभेच्या जागेवर अजित पवार यांनी दावा केला होता. आठवड्याभरापूर्वी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पुण्याची सध्याची परिस्थिती पाहिली तर कुणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिलं पाहिजे. त्यांना पडलेली मतं पाहिली पाहिजेत, त्यानुसार या जागेचा निर्णय होईल. परंतु शनिवारी मात्र काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची जागा काँग्रेसने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचे यासंदर्भात एकमत झाले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. शहराध्यक्षांना पक्ष संघटनात्मक तयारी करण्याच्या सूचना दिल्या. पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसचं लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच आगामी निवडणुकांसाठीही तयारी करण्याचे आदेशही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

रामटेक मतदारसंघात ठाकरे गट-काँग्रेस आमने सामने येण्याची शक्यता

रामटेक लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाने नाही तर काँग्रेसने लढावावी, असा आग्रह मुंबईतील झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांनी केला. लोकसभा निवडणूक पूर्वतयारी बैठकीत रामटेकच्या जागेसाठी नेत्यांचा आग्रह असल्याने, पुन्हा एकदा काँग्रेस आणि ठाकरे गट आमने-सामने आला आहे. या मागणीनंतर ठाकरे गटाचे नागपूर जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी काँग्रेसला डिवचलंय. “रामटेक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस संभ्रम निर्माण करत आहे. पराभव होण्यापेक्षा रामटेकचा आग्रह सोडा. रामटेक लोकसभा आणि विधानसभा बाळासाहेब ठाकरे यांच्या आस्थेचा विषय आहे, शिवसैनीक आस्थेसोबत बेईमानी होऊ देणार नाही” असं गोडबोले म्हणाले.