संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. थुंकल्याबद्दल आपण माफी मागणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. या देशातील 130 कोटी लोकांना माफी मागावी लागेल. रोज ते कुठे ना कुठे थुंकत असतात. मी राजकीय लोकांचे नाव घेतल्यावर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. ज्यांनी महाराष्ट्र, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी बेईमानी केली. त्यांचं नाव ऐकल्यावर माझी जीभ चावली गेली. त्यातून थुंकलं गेलं. यांना जीवशास्त्र, रसायनशास्त्र काही कळतं का? मानसशास्त्रं कळतं का? माझ्या इतकं चांगलं संतुलन कुणाचंच नाही. माझ्यामुळे इतरांचं संतुलन बिघडलं आहे. हे त्यांनी मान्य करावं, असं संजय राऊत म्हणाले.
अजित पवारांचा राऊतांना सल्ला
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे काल प्रतिक्रिया देताना शिंदे गटाच्या नेत्याचं नाव घेताच थुंकले. माध्यमात हा क्षण कैद झाला त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणाला स्व.यशवंतराव चव्हाणांचा वारसा, सर्वांनीच संयमाने वागलं पाहिजे,असा टोला संजय राऊत यांना लगावला अजित पवारांचा हा सल्ला संजय राऊत यांना पचनी पडलेला दिसत नाही. राऊत यांनी त्यावरून थेट अजित पवारांवर खोचक टीका केली आहे धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं संयम तर राखला पाहिजे सर्वांनी बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली.आम्ही भोगूनही जमिनीवर आहोत इकडे तिकडे पळालो नाही. माझ्या पक्षाबरोबर मी ठामपणे उभे आहोत.आमच्यावर संकट येतात म्हणून भाजपसोबत सूत जुळवण्याचा आमच्या मनात विचार येत नाही, असा टोलाही राऊत यांनी पवारांना लगावला.
संजय राऊतांना वकीलपत्र दिलं का?
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांच्या भाजपाप्रवेशासंदर्भातील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या वावडयांबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. माझ्याविषयी माझ्या पक्षातील प्रवक्ते बोलतील, पण बाकीच्यांना ते वकीलपत्र मी दिलेले नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकप्रकारे निशाणा साधला. माझ्या पक्षात आकस असणारे कुणी नाही. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते हे जणू ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत असे वागत आहेत. मी ही बाब महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडणार आहे. ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षाचं सांगा ना. तुमच्या पक्षाचे मुखपत्र चालवता त्याबद्दल लिहा. आम्हाला कोट करून कशाला लिहायचे, अशा शब्दांत अजित पवार यांनी ‘सामना’वर तीर चालवला.
सामनामधील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीचा दाखला देत त्यात शरद पवारांनी पक्षातील काही लोक बाहेर जाऊ इच्छितात पण तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत जाणार नाही, असे विधान केल्याचे म्हटले होते. त्यावरूनच अजित पवार पत्रकारांसमोर संतापले.
थुंकण्यावरून संजय राऊतांनी स्वतःची तुलना सावरकरांशी करणं योग्य आहे का?
मी कुणावर थुंकलो? हे वीर सावरकरांचे भक्त आहेत. न्यायालयात आणण्यात आलं होतं. त्यांची माहिती देणारा बेईमान माणूस समोर उभा होता. त्याच्याकडे बघून सावरकर थुंकले हे इतिहासात नोंद आहे. थुंकणं हा हिंदुसंस्कृतीचा भाग पण मी कोणावरही थुंकलो नाही. वीर सावरकरांनी सुद्धा आपला संताप बेईमानावर व्यक्त केला होता मी सावरकरांचा भक्त आहे. सावरकर, ठाकरे, टिळकांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. चीड आणि संताप कोणत्याही प्रकारे व्यक्त होत असते. तुम्ही जे म्हणत आहात थुंकलो थुंकलो कुठे थुंकलो? माझ्या दाताचा प्रॉब्लेम होता त्यामुळे थुंकल्यासारखे वाटले असेल. त्यांना वाटतंय आपल्यावर लोक थुंकत आहेत. आपल्याला लोक जोडे मारत आहेत. ही त्यांची मानसिकता आहे. लोकं त्यांच्यावर थुंकतात हे खरं आहे. पण ते मी का व्यक्त करू असंही राऊत म्हणाले.
