येत्या 10 जून रोजी नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेला पन्नास हजारांहून अधिकचे लोक उपस्थित राहतील, असा दावा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय. शहा यांची सभा ज्याठिकाणी होणार आहे त्या जागेचे भूमिपूजन आज खासदारांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. शहरातील अबचलनगर भागातील खुल्या मैदानात ही सभा होणार आहे. त्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आलीय.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्ष पूर्ण झालेत. त्या निमित्ताने नांदेडमध्ये अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आलीय. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात नांदेडला काय काय मिळाले याची उजळणी या निमित्ताने होणार आहे. मात्र प्रत्यक्षात भाजप या सभेच्या निमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहे. या शक्ती प्रदर्शानाच्या तयारीला भाजप कार्यकर्ते लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केल्याचे यातून दिसतंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत जिल्हा,मंडळ शक्ती केंद्र व बूथ पातळीवर वेगवेगळे स्वरूपाचे कार्यक्रम घेत सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. यामध्ये संपर्क से समर्थन यापासून हे अभियान सुरु झाले.या अभियानात सर्व नेते, मंत्री सहभागी घेणार असून देशपातळीवर एका मंत्र्याला दोन लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री अमित शाहा यांचा 10 जून रोजी नांदेड दौरा आयोजित करण्यात आला आहे, असे भाजप प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी सांगितले.
नांदेड हा अशोक चव्हाण यांचा गड मानला जातो. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद आहे. मविआ एकत्र लढल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात. नांदेडमध्ये शक्ती प्रदर्शन करून अशोक चव्हाणांच्या अडचणी वाढवण्याचा इरादा आहे. अबचलनगर भागातील खुल्या मैदानात ही सभा होणार असून, त्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
