परदेशातील उद्योगांद्वारे भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या तिमाहीत महाराष्ट्र हे राज्य इतर सर्व राज्यांच्या पुढे गेलं आहे. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, पुन्हा एकदा एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर १! देशातल्या परकीय गुंतवणुकीत २९ टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रानंतर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. परकीय गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असल्याचा कंठशोष करणाऱ्यांना या आकडेवारीने चपराक लगावली आहे. तसेच गुजरातच्या नावाने सातत्याने भाजपला अडचणीत आणू पाहणाऱ्यांनाही हे खणखणीत उत्तर आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“महाराष्ट्र उद्योगात पहिल्या नंबरवर होता आणि पुन्हा आम्ही महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर आणू”, असं फडणवीस काही महिन्यांपूर्वी एका भाषणात म्हणाले होते. या भषणाचा काही भाग, तसेच वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत परकीय गुंतवणुकीबद्दल त्यांनी केलेले दावे ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यात फडणवीसांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला असेल तर दोन वर्षात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नेऊ. ही हेल्दी कॉम्पिटिशन (निरोगी स्पर्धा) आहे. गुजरात हा आपला लहान भाऊ आहे. तो काय पाकिस्तान नाही. आम्हाला गुजरात, कर्नाटकसह सर्व राज्यांच्या पुढे जायचं आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र परकीय चलनाच्या बाबतीत पहिल्या नंबरवर येईल.
