मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. हा पाऊस म्हणजे वाळवाचा पाऊस म्हटला जात होता. यामुळे वळवाचा पावसानंतर मान्सून दाखल होणार होता. मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले होते. परंतु अचानक मान्सून रुसला, त्याने आपली चाल बदलली. आता काही दिवसांची अजून प्रतिक्षा मान्सूनसाठी करावी लागणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. केरळमध्ये अजून मान्सून दाखल झाला नसल्यामुळे राज्यात मान्सूनला उशीर होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्यावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे अद्याप मान्सून केरळातच दाखल झालेला नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण मान्सूनचा मुहूर्त हुकला. केरळमध्ये अद्यापही मान्सूनसाठी अनुकूल वातावरण नसून, आगमनासाठी आणखी चार ते पाच दिवस लागतील, असा अंदाज हवामान खात्याने आता व्यक्त केला आहे. दुसरीकडे वळीवाच्या पावसाने मात्र राज्यातील बहुतेक भागात हजेरी लावली आहे.
दुसरीकडे, पूर्व भारतातील राज्यांमध्ये विशेषतः बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेचे संकट अधिक गडद होत आहे. आगामी काळात पूर्व भारतातील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मान्सूनची उत्तर सीमा गेल्या चार दिवसांपासून एकाच ठिकाणी अडकली आहे. अरबी समुद्रात पश्चिमेकडील वाऱ्यासह केरळच्या दिशेने संथ गतीने सरकणारे ढग चक्रीवादळामुळे खेचले गेले आहे. केरळच्या किनारपट्टीवर दक्षिण अरबी समुद्रातील पश्चिमेचे वारे समुद्रसपाटीपासून सुमारे 2.1 किमी उंचीपर्यंत वाहत आहेत, पण मान्सूनसाठी ते 4.6 किमीपेक्षा जास्त हवे आहे. अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे. अजूनही मान्सून दोन-तीन दिवस तिथेच अडकून राहू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
