2 जून रोजी ओडिशा येथे झालेल्या शतकातील सगळ्यात भीषण अपघाताने संपूर्ण भारताला हादरवून सोडले आहे. या अपघातात सुमारे 278 लोक मृत्युमुखी पडले असून 1000च्या वर लोकं जख्मी झाले आहेत. या अपघातात किमान 40 लोक विजेच्या झटक्याने मृत्युमुखी पडले असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. हे सर्व प्रवासी कोरोमंडल एक्सप्रेसमधून प्रवास करत होते, आणि अचानक झालेल्या या मोठ्या अपघातात विजेचा तीव्र झटका लागल्याने त्यांचा मृत्यु झाला.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये (Coromandel Express) सापडलेल्या सुमारे 40 मृतदेहांवर जखमांच्या कोणत्याही खुणा नाहीत. त्यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बालासोर येथील रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये (GRP) एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये ही बाब नमूद करण्यात आली असल्याचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
रेल्वे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, हा अपघात घडला तेव्हा थेट ओव्हरहेड वायर तुटून काही डब्यांमध्ये अडकली. त्यामुळे प्रवाशांना विजेचा मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पी कुमार नायक यांनी त्यांच्या एफआयआरमध्ये म्हटले की, “अनेक प्रवासी अपघातात जखमी झाल्याने मृत्यूमुखी पडले. ओव्हरहेड एलटी (कमी दाबाची) लाईनच्या संपर्कात आल्यावर विजेचा धक्का बसला. तिहेरी रेल्वे अपघातादरम्यान रेल्वेचे डबे उलटले. यातच ओव्हरहेड वायरला धक्का बसला, शिवाय रुळालगत असलेल्या विजेच्या खाबांना धक्का बसला.
एकूणच या भीषण अपघातामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे, आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
