संजय राऊत म्हणजे सिल्व्हर ओकच्या दारात उभा राहणारा शिपाई आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काल दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. यावरुन संजय राऊत यांनी टीका केली होती. डुप्लीकेट शिवसेनेचे नेते कोण हे त्यांनी आधी सांगावे? बाळासाहेब ठाकरे की अमित शाह? तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दिल्ली म्हणजे मक्का-मदिना आहे. परंतु एकनाथ शिंदे तिकडे का जातात? असा सवाल राऊतांनी केला होता. यावरुन नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं आहे.
“संजय राऊत म्हणजे सिल्वर ओकच्या बाहेरचा शिपाई आहे. कुणाला नावं ठेवताय? महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार होतं, तेव्हा आपल्या माहित आहे ना? सोनिया गांधींनी अट ठेवली होती की जोपर्यंत उद्धव ठाकरे माझ्या दाराशी येत नाहीत तोपर्यंत मी सरकार स्थापनेला संमती देणार नाही. तुम्हाला मदत करणार नाही. त्यावेळी दिल्ली दरबारी म्हणजेच सोनियांच्या दरबारी कोण झुकलं असेल तर ते उद्धव ठाकरे. सोनियांच्या दारी झुकणारे पहिले ठाकरे ते होते. त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला झुकणारे म्हणू नये. प्रणव मुखर्जी हे जेव्हा राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी मातोश्रीवर आले होते तेव्हा सोनिया गांधी नाराज झाल्या होत्या. प्रणव मुखर्जींच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख आहे. हे काय आम्हाला शिकवत आहेत? ” असं नरेश म्हस्केंनी म्हटलं आहे.
शिल्लक सेनेतले लोक त्यांना सोडून चालले आहेत. त्यांच्यावर एक प्रकारे थुंकत आहेत. संजय राऊत नावाचा वेडा माणूस स्वतःचे कपडे फाडणार आहे आणि रस्त्यावर फिरणार आहे असंही नरेश म्हस्केंनी म्हटलं आहे. सोनिया गांधींकडे सत्तेसाठी कोण गेलं होतं? तेव्हा त्यांनी काय लोटांगण घातलं होतं का? संजय राऊत काय बोलतात? राहुल गांधींबरोबर गळ्यात गळे घालून तुम्ही भारत जोडो यात्रेत फिरलात तेव्हा काय पाय धरले होते का? त्याचं उत्तर द्या. असंही नरेश म्हस्केंनी म्हटलं आहे.
