ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊतांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सभागृहात कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. संभाजीनगर येथील शिवसेनेच्या शाखेचा 38 वा वर्धापनदिनानिमित्त राऊत बोलत होते. संजय राऊत म्हणाले शिवसेना पक्ष नाही तर ज्वलंत विषय आहे. शिवसेनेला जे गद्दार सोडून गेले ते परत निवडून येणार नाहीत.
शिवसेनेचा एक धगधगता इतिहास आहे. परंतु इतिहासाबरोबर भूगोलाचा विचारही करायला हवा. आपल्या ताब्यात किती भूगोल आहे हे राजकारणात महत्त्वाचं आहे. मी मंचावर बसल्यावर समोर पाहिलं. या समोरच्या गॅलरीवर माझं लक्ष होतं. हा मराठवाडा इतका मोठा आहे, मराठवाड्यात इतके जिल्हे आहेत. येथील कार्यक्रमाला खूप गर्दी जमते. यापूर्वी ८ जूनला आम्ही इथे आलेलो आहोत. परंतु कधीच समोरची गॅलरी रिकामी दिसली नव्हती. पण आज ती रिकामी आहे. आपल्या सर्व प्रमुख नेत्यांनी यावर आत्मचिंतन केलं पाहिजे.
राऊत म्हणाले, पदाधिकारी हे फक्त एकटे कार्यक्रमाला आले त्यांनी आपल्यासोबत प्रत्येकी 10 शिवसैनिकांना आणले नाही, अशा शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.शिवसैनिक का आले नाहीत याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. शिवसैनिक का आले नाहीत याचं आत्मपरिक्षण करावं. आपल्याकडे सध्या पक्षाचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह नाही, तरिही आपण लढत आहोत संघर्ष करत आहोत, हे लक्षात ठेवावं.
