केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान हमीभाव किमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये भाताच्या किमान हमीभावामध्ये 143 रुपयांची वाढ केली आहे, तर ज्वारीच्या किमान हमीभावामध्ये 210 रुपायंची वाढ करण्यात आली आहे. भात पिकाच्या किमान हमीभावामध्ये वाढ होऊन आता ती 2183 रुपये करण्यात आली आहे, तर ज्वारीचा किमान हमीभाव आता 235 वर पोहोचला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिह तोमर यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारकडून दरवर्षी हमीभाव जाहीर केले जातात. यंदा काहीसा उशिराने पण भरीव वाढीसह हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत ८०५ रुपयांच्या वाढीसह तिळाचा हमीभाव ८,६३५ रुपयांवर, तर ८०३ रुपयांच्या वाढीसह मुगाचा हमीभाव ८,५५८ रुपयांवर गेला आहे. देशातील तूर डाळीच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर ४०० रुपयांच्या वाढीसह तुरीचा हमीभाव सात हजार रुपये करण्यात आला आहे.
२०२२-२०२३ च्या हंगामात सोयाबीनला ४३०० रुपये हमीभाव होता. जो यावर्षी ४६०० रुपये इतका असणार आहे. सरकारने याला मोठी वाढ म्हटले असले, तरी शेतकरी मात्र या बाबत समाधानी नाहीत. शेतकऱ्यांच्या मते उत्पातन खर्च हा यापेक्षा जास्त आहे. वाढलेला खर्च बघता सोयाबीनला किमान ६००० रुपये हमीभाव असणे गरजेचे होते, असे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या तुरीच्या दराने ११ हजाराचा टप्पा पार करून नवा उच्चांक गाठला असल्याने केंद्र सरकारने दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे यंदा तुरीच्या हमीभावात वाढ होणार नाही असा अंदाज होता. मात्र केंद्र सरकारने यात वाढ करून ७००० रु प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. मागील वर्षी तुरीच्या ६६०० रुपये हमीभाव होता.
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच जास्तीत जास्त प्रदेश कृषी पिकाखाली यावा यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, कृषी खर्च आणि किमती आयोगाकडून वेळोवेळी येणाऱ्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खरीप पिकांसाठी सर्वाधिक किमान हमीभाव जाहीर करण्यात आला आहे आणि त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे.
भात – २१८३रुपये – १४३ रुपयांची वाढ
ज्वारी – ३१८० रुपये – १४३ रुपयांची वाढ
ज्वारी मालदांडी – ३२२५ रुपये – २३५ रुपयांची वाढ
रागी – ३८४६- २६८ रुपयांची वाढ
तूर – ७००० रुपये – ४०० रुपयांची वाढ
सोयाबीन – ४६०० रुपये – ३०० रुपयांची वाढ
मूग – ८५५८ रुपये – ८०३ रुपयांची वाढ
तिळ – ८६३५ रुपये – ८०५ रुपयांची वाढ
