मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर मान्सूनचे केरळमध्ये आगमन

भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. मान्सूनचं आजचं केरळमध्ये आगमन झालं असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. दरवर्षी १ जून रोजी मान्सूनचं आगमन केरळमध्ये होतं, यंदा तब्बल ७ दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, ८जून २०२३ रोजी प्रवेश केला आहे. मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरु आहे. केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन भाग, मन्नारचे आखातात मान्सून दाखल झाला आहे.

मान्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील ४८ तासांत कर्नाटकात आणि मंगळवार, १३ जूनपर्यंत कोकणात पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे पावसाचा जोर कमी असणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख १ जून आहे. यंदा ४ जूनपर्यंत पाऊस येईल, असा अंदाज होता. त्यानंतरही चार दिवसांच्या विलंबाने आलेल्या मोसमी पावसाने केरळचा ७५ टक्के आणि तमिळनाडूचा ३५ टक्के भाग व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

दरम्यान, गेल्या १२ वर्षांचा अभ्यास केला असता केवळ एका वर्षीचं मान्सून महाराष्ट्रात ७ जूनच्या दरम्यान दाखल झाला होता. मान्सूनचा गेल्या १२ वर्षातील प्रवास पाहिला असता महाराष्ट्रात मृग नक्षत्राला मान्सून दाखल होतो हे समीकरण बदललं असल्याचं दिसून येत.