राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत ट्विट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी तातडीने नोंद घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिली.

राजकीय पातळीवर मतभेद असतील पण मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमकी येणं खपवुन घेणार नाही. कायद्याप्रमाणे पोलिस निश्चित कारवाई करतील. सभ्येतेच्या मर्यादा ओलांडणे खपवुन घेणार नाही. अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. शरद पवार यांच्यापाठोपाठ संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आय़ुक्तांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मला व्हॉट्सअॅपवरुन हा एक मेसेज आला. कोणत्या तरी एक वेबासाइटवरुन धमकी देण्यात येत आहे. त्याचे फॉलोअर्स जे आहे ते देखील वाईट पद्धतीच्या कमेंट यावर करत आहे, असे त्या म्हणाल्या. तुमचाही दाभोलकर होणार, असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर अनेकांनी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ देखील केली आहे.