भारत बलवान औद्योगिक राष्ट्र म्हणून उभारी घेत आहे – खा.डॉ.अनिल बोंडे

देशभरात उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळत असून रोजगार निर्मिती होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने सर्व घटकांचा विकास करत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याने भारत औद्योगिक राष्ट्र म्हणून उभारी घेत असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन यावेळी राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले. अडीच वर्षात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बरबाद केला. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाने पीएममित्रा प्रकल्प येऊ शकला. ज्या माध्यमातून तीन लाख नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला. केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गोरगरीब नागरिकांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. अन्नधान्य मोफत नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे पाठवण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घर बांधून देण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचा विकासरथ हा कोणीच थांबवू शकत नसल्याचे सुद्धा डॉ. बोंडे यांनी स्पष्ट केले.

भारताचा महासत्तेच्या दिशेने प्रवास सुरू झालाय :आमदार नितेश राणे

नांदगाव पेठ येथे ‘विकासतीर्थ’ कार्यक्रम नऊ वर्षात झालेला विकास हा सर्व घटकांचे कल्याण करणार आहे.2014 पुर्विचा भारत आठवल्यास भ्रष्टाचाराने बोकाळलेला भारत होता. कोणालाही नोकरी मिळत नव्हती. मात्र गांधी कुटुंबीयांच्या खिशात पैसे पोहोचत होते. हे चित्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर पूर्णपणे बदलले. आता देशाचा विकास झपाट्याने होत असल्याने भारताची वाटचाल ही महासत्तेच्या दिशेने सुरू झाली असल्याचे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला नऊ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी @9 हे महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ‘विकासतीर्थ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार नितेश राणे हे बोलत होते. यावेळी खा. डॉ.अनिल बोंडे, आमदार संजय केळकर, आमदार प्रवीण पोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, तुषार भारतीय, शिवराय कुलकर्णी, माजी आमदार रमेश बुंदिले, सरचिटणीस राजेश पाठक, प्रशांत शेगोकार, सिद्धार्थ वानखडे, नितीन गुडधे, संगीताताई शिंदे, गजानन देशमुख, सत्यजित राठोड, जयराज बजाज यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी बोलताना राणे म्हणाले, मातोश्रीवर खोके पोहोचल्याशिवाय विकास होत नव्हता. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने उद्योग क्षेत्रात मोठी भरभराटी केल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन बादल कुलकर्णी तर आभार सत्यजित राठोड यांनी मानले. प्रास्ताविक किरण पातुरकर यांनी केले.

देशाचा न भूतो न भविष्यती विकास : आ.केळकर

तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ज्या ठिकाणी विकास कार्य झाले त्याठिकाणची माती कपाळाला लावण्याची गरज असल्याचे आमदार संजय केळकर म्हणाले. इतके मोठ्या प्रमाणात काम सरकारने केले आहे. विदर्भात 1994 पासून टेक्स्टाईल पार्कची मागणी होत होती. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारने ती पूर्ण केली नाही. 2014 ला केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विश्व नेते आहेत. कुणी ऑटोग्राफ मागत आहे तर कोणी थेट पाया पडत आहे. संविधान हातात घेऊन मानवता धर्म पाळणारा असा पंतप्रधान कधीही होणार नाही. पुढल्या पिढ्या बलवान करायचे असतील तर मोदीजीच 2024 मध्ये हवे आहेत असेही आमदार संजय केळकर हे म्हणाले