रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांची नोटीस

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेनेते रविकांत तुपकर यांना फौजदारी कलम १४९ अन्वये बुलढाणा पोलिसांच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई येथील पिकविमा कंपनीचे कार्यालय असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीच्या २० व्या मजल्यावरुन शेतकऱ्यांसह उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा गंभीर इशरा दिला आहे.

तुपकरांंच्या इशाऱ्यानंतर पोलीस यंत्रणानाही अलर्ट मोडवर आल्या आहेत. बुलडाणा शहर पोलिसांनी तुपकरांना प्रत्यक्ष घरी जाऊन नोटीस दिली असून असे कोणत्याही प्रकारचे आंदोलन करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. पण आता माघार नाही, जीव गेला तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणारच, अशी भूमिका तुपकरांनी घेतली आहे.गेल्या काही महिन्यांपासून तुपकर, सोयाबीन – कापसाला दरवाढ द्यावी, पीकविमा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा मदतनिधी त्यांच्या खात्यात जमा करावा, पेरणीपूर्वी पीककर्जाचे वाटप करावे, पेरणी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करत आहे. पण सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने त्यांनी आता थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे.

त्यामुळे १५ जून पर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास १६ जून रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत धडक देऊ आणि एआयसी या विमाकंपनीच्या मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केट मधील २० व्या मजल्यावर असलेल्या कार्यालयातून उड्या मारु, असा गंभीर इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.