शरद पवारांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं रविवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (वय 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सागर बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं आहे. याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी सागर बर्वेने फेसबुकवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ नावाने पेज तयार केले होते. त्याने या फेसबुक पेजवरुन शरद पवार यांना उद्देशून ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…’, अशी धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यासोबतच सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुनही आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये शरद पवार यांची तुलना औरंगजेबाशी करणारा मजकूर पोस्ट करण्यात आला होता.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन आरोपींच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर एलटी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढे हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.युनिट २ ने इलेक्ट्रॉनिक टेहळणीच्या आधारे सागर बर्वेला अटक केली. दरम्यान सागर बर्वे याने असे कृत्य का केले, यामागे त्याचा उद्देश काय होता याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

दरम्यान, राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक अकाउंटवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावानं एक अकाउंट आहे. त्यावर असलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.