रस्त्याच्या कामात गडबड झाल्यास मला कळवावे, त्याला रगडून टाकायचे काम मी करेल – नितीन गडकरी

छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याच्या कामात गडबड झाल्यास मला कळवावे, त्याला रगडून टाकायचे काम मी करेल, असा थेट इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगर ते पैठण या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. रविवारी मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

देशातील द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहनांची वेगमर्यादा वरून राज्य आणि केंद्रात समन्वय नसल्याच्या प्रश्नाला देखील नितीन गडकरी यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “या विषयात केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही अधिकार आहे.यासाठी दिल्लीत रस्ते वाहतूक मंत्र्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत सर्वांचा सल्ला घेण्यात आला.त्यानंतर आता नवीन स्पीड अंतिम करण्यात आला. या नवीन स्पीडबाबत पुढील 3-4 दिवसांत आदेश काढण्यात
येणार आहे. ज्यात स्पीड वाढवण्यात आला आहे. नवीन स्पीड ठेवण्याबाबत दोन वेगवेगळी मत होती, त्यामुळे यातील समन्वय साधून स्पीड ठरवण्यात आला. यासाठी राज्य सरकारला 2-3 दिवसांत राजपत्र अधिसूचना जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकार सुधारित राजपत्र अधिसूचना काढतील, असे गडकरी म्हणाले.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, की छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्त्याच्या कामावर पत्रकारांनी लक्ष ठेवावे, काहीही गडबड झाल्यास मला कळवावे. संबंधित कंत्राटदारावर आमच्याकडून कडक कारवाई करण्यात येईल. कोणी किती रुपयात टेंडर घ्यायचा हे नाही, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयांची कामे केली. एकही ठेकेदार माझ्या घरी येत नाही. आमच्याकडे भ्रष्टाचार होत नाही, स्पर्धा होते. त्यामुळे पैठण रस्त्याचे काम ज्याने 41 टक्के घेतले त्याच्या कामावर दुर्बीण घालून लक्ष ठेवा. त्याने कुठेही गडबड केली तर मला सांगा, रगडून टाकायचे काम मी करेल. तसेच त्याला रस्ता दुरुस्त करायला लावेल. पण कोणी किती टक्क्यांनी कामे घ्यावे, याला थांबू शकत नाही.