राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही भाकरी फिरणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलानंतर आता लवकरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याचवेळी पाटील प्रदेशाध्यक्ष पदासाठी चाचपणी करणार आहेत.
विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाना पटोले यांना प्रदेशाध्यपदावरून हटवण्यासाठी पक्षातूनच प्रयत्न होत असल्याचं दिसून आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पाटील या दोन दिवसांच्या दौऱ्यात राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. विदर्भातील नेत्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांआधी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे.गेल्या काही महिन्यापासुन काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसुन येत होती. नाना पटोले यांच्या कार्यशैलीवरून अनेक नेत्यांनी तक्रार केली होती. पहिल्यांदा बाळासाहेब थोरात त्यानंतर विदर्भातील काही नेते यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर गेल्या निवडणुकीवेळी काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दिल्लीमध्ये हायकंमाड, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देखील अनेक नेते भेटले होते.
