लाठीचार्ज नव्हे तर मंदिरात प्रवेश करताना वारकऱ्यांनीच पोलिसांना तुडवलं!

आळंदी येथील ज्ञानेश्वर मंदिरात पोलिसांनी मंदिरात येऊ पाहणाऱ्या वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, लाठीमार झाला नसून वारकऱ्यांनीच गर्दी करून पोलिसांना तुडवत मंदिरात प्रवेश केल्याचे दिसून आले आहे.

आळंदी येथील ज्ञानेश्वर मंदिरात रविवारी काय घडले याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली असून एका क्षणी पोलिसांचे कडे तोडून त्यांना तुडवत वारकरी मंदिरात शिरत असल्याचे दिसत आहे.आळंदीमध्ये जे काही घडले, त्याचे चित्रण पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी वारकऱ्यांवर नाहक लाठीमार केला, असा आरोप केला जात आहे. मात्र, पोलिसांनी जारी केलेल्या व्हिडिओनुसार, शेकडो वारकरी बॅरिकेड्स तोडून येथील मंदिरात जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पोलिस वारकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र, वारकऱ्यांचा प्रचंड लोंढा व मोजकेच पोलिस यामुळे वारकरी पोलिसांना जुमानत नाहीत. मंदिरात जाण्याच्या प्रयत्नात वारकरी पोलिसांना ढकलतात. यादरम्यान एक पोलिस कर्मचारी खाली कोसळतो, असेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

एक पोलिस कर्मचारी खाली कोसळल्यानंतर वारकरी वेगाने पोलिसांचे कडे तोडून पुढे जातात. यावेळी तेथे उपस्थित असलेले इतर पोलिस तसेच राज्य राखीव दलाची तुकडी समोर येते. ते वारकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. तरीही वारकरी पुढे जात राहतात. त्यानंतर पोलिस लाठी बाहेर काढत वारकऱ्यांना मागे नेण्यासाठी जमिनीवर तर काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार करताना दिसत आहेत.