भावी मुख्यमंत्रीच्या स्पर्धेत राज ठाकरे यांची एन्ट्री, राज ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, शिवतिर्थावर लागले बॅनर्स

गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे बॅनर झळकलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, नेत्या सुप्रिया सुळे, तर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले.या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश झाला आहे. शिवतीर्थावर राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्याचे सांगितले जात आहे.

येत्या 14 जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने दादरच्या शिवतिर्थावर भलं मोठं बॅनर लावण्यात आलं आहे. त्यावर महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे असं ठळक अक्षरात लिहिलं आहे. तसेच हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा, असा मजकूरही या बॅनर्सवर लिहिण्यात आला आहे. त्याशिवाय या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांचाही मोठा फोटो आहे. त्यानंतर पदाधिकारी आणि नेत्यांचेही फोटो आहेत. शिवतिर्थावर हे फोटो लागल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत राज्याची सत्ता आणण्याच्या दृष्टीने मनसे कामाला लागणार असल्याचे संकेतही या निमित्ताने मिळत आहेत.

राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत येताना झाडांची रोपे आणि शैक्षणिक साहित्य घेऊन येण्याच्या आवाहन केले आहे. तर कोणतीही भेटवस्तू अथवा बुके आणू नये, असे देखील त्यांनी म्हटले आहे. तुम्ही आणलेल्या शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पक्षाच्या वतीने पोहोचवले जाईल, असे देखील आवाहन त्यांनी केले आहे. 14 जून रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत राज ठाकरे सर्वांना भेटतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.