उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळं येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळं काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शनिवारी (१० जून) मान्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात धडक दिली.सध्या मान्सूनच्या वाटचालीची सीमा कारवार, मेरकरा, कोडाईकनाल, आदिरामपट्टीनमपर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. कर्नाटकमध्ये आलेला मान्सून पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुढील दोन दिवसात मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंग्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, धुळे, जळगाव, नंदुरबारसह मराठवाडा व विदर्भाला जोरदार पावसाचा तडाखा बसणार आहे. राज्यात १५ जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या काळात राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, सध्या बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला ६३० किमीवर आहे. आगामी २४ तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्येही जाणवेल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
