तर अग्रलेख लिहिण्याची वेळ आली नसती, राष्ट्रवादी कडून राऊतांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी मोठा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. मात्र यावेळी अजित पवारांवर कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सामनाच्या अग्रलेखात देखील शरद पवारांच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित करत अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे.

“काही जण शरद पवारांनी ‘भाकरी फिरवली’ असं म्हणत असतील, तर त्यात दम नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. नागालॅण्डमध्ये त्यांचे चार-पाच आमदार निवडून आलेत. राज्याबाहेर लक्षद्वीप येथे त्यांचा खासदार आहे. केरळ विधानसभेत त्यांचे एक-दोन सदस्य आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्व काही आटोपशीर आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज काय पडली?,” असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

याला राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे नेते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊत यांनी आमच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा तपासण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या पक्षाचा दर्जा काय हे पाहिलं असतं, तर अशी अग्रलेख लिहिण्याची वेळ आली नसती. आमची भाकरी फिरली नाही, हे पाहण्यापेक्षा तुमची भाकरी आणि चूल ज्यांनी पळवून नेली आहे, त्यांच्याकडं लक्ष द्यायला हवं होतं,” असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं.