आमदार राम शिंदेंना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मध्य प्रदेशातून अटक

चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या आदल्यादिवशी (३० मे) रोजी भाजप नेते आणि आमदार राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आमदार रोहित पवार यांचा संपर्क देत राम शिंदेंना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी अमित चिंतामणी यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी सागर सुभाष गवासणे (वय ३४) हा मूळचा जामखेड तालुक्यातील आहे. सध्या तो पुण्यात वाकड परिसरात राहतो. मध्यप्रदेशच्या उज्जैन परिसरातून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी गवासणे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध नगरसह बीड आणि धाराशिव जिल्ह्यातही गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न आणि अवैधरित्या शस्त्र बाळगल्याचे गुन्हेही त्याच्याविरूद्ध आहेत. त्यामुळे पोलिस याचा सखोल तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित अरुण चिंतामणी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी येथील पुण्यतिथी कार्यक्रमाची तयारी करीत असताना त्यांच्या मोबाईलवर सागर गवासणे याने फोन करुन धमकी दिली होती. त्यामध्ये म्हटले होते की तुम्ही राम शिंदे साहेबांच्या जवळचे आहात त्यांना जुळवून घेण्याचे सांगा नाहीतर पाहुन घेईन अशी धमकी चिंतामणी यांना दिली होती. त्यानंतर फेसबुक लाईव्ह करुन आमदार राम शिंदे साहेब व अपरिचीत व्यक्तीचे नाव घेऊन घरात घुसून मारीन अशी धमकी देऊन दोन राजकीय पक्षाचे लोकांमध्ये तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. घटनेबाबत फिर्यादीने जामखेड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशन अदखलपात्र दाखल करण्यात आला होता.