उद्धव ठाकरेंच्या वागणुकीला कंटाळून शिवसेनेतून आमदार, खासदार बाहेर पडले – खासदार श्रीकांत शिंदे

राज्यात भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र येऊन सत्तास्थापन केली. तसेच आगामी निवडणुका एकत्र लढण्याचेही सुतोवाच केले जात आहेत. अशातच ठाण्यात भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी पडली. एकीकडे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला मदत न करण्याचा ठराव मंजूर केला, तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदेंनी राजीनाम्याची तयारी दर्शवली.

कल्याणमध्ये शिंदे गटाचा मेळावा होता. या मेळाव्याला श्रीकांत शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. आपली युती नैसर्गिक आहे. त्यामुळे आपल्या भावना आवरा. युती धर्म पाळा. एकत्र येऊन काम कराल तर काम चागल होतंय, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी दोन्हीकडच्या नेत्यांना सुनावले. तसेच उत्साहाच्या भरात काही कार्यकर्त्यांनी पोस्टर लावल्याचंही त्यांनी सांगितलं.

या मेळाव्यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. अगोदरच सरकार घरी होतं. आता हे सरकार आपल्या दारी आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप वेळ होता. त्यामुळे ते पंढरपूरला गाडी चालवत जायचे, अशी टीकाही त्यंनी केली. तसेच राम मंदिर बांधणाऱ्यांसोबत गेलो तर बिघडलं कुठे?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. काँग्रेससोबत जाण्याआधी मी माझं दुकान बंद करेल, असं बाळासाहेबांनीच सांगितलं होतं ना? मात्र, हे सत्तेसाठी पायऊतार झाले, अशी टीकाही त्यांनी केली.

कर्नाटक सरकारने अभ्यासक्रमातून सावरकरांचे धडे वगळले आहेत. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. आता जे लोक काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांनी सांगावं त्यांना हे मान्य आहे काय? असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
त्यांच्या डोक्यात खोके प्रचंड घुसले आहेत. आधी खोके यायचे आता ते बंद झाले आहेत, अशी टीका करतानाच कोरोना काळात सामान्य शिवसैनिक रस्त्यावर राबला. घराबाहेर पडला. यांनी फक्त ऑनलाईन मार्गदर्शन केलं. तरीही ते टॉप 5मध्ये कसे? असा सवाल त्यांनी केला आहे.