महाराष्ट्राला नवी दिल्लीत ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त

पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू, तसेच केंद्रीय सचिव पंकज कुमार उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध श्रेणीत प्रथम आलेल्या राज्यांना, शहरांना, महानगर पालिकांना, नगर पालिकांना, ग्राम पंचायतींना उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

उत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार या श्रेणीमध्ये जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच दत्तु निबांळकर, माजी सरपंच भीमराव जाधव आणि खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ एस.व्ही. सोनुने यांनी स्वीकारला. हा पुरस्कार मेघालय राज्यातील री भोई जिल्हा येथील मावकिर्देप या ग्राम पंचायती सोबत विभागून मिळालेला आहे.

कडेगाव हे खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्राच्या अंतर्गत येते. राष्ट्रीय नाविन्यपूर्ण हवामान लवचिक कृषी कार्यक्रम प्रकल्पा अंतर्गत 2015-16 मध्ये कडेगावाला दत्तक घेण्यात आले. या गावात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनानुसार विविध हवामान अनुकूल उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यापैकी नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन या घटका अंतर्गत गावात सिमेंट नाल्याचे बांधकाम, बांधामधील गाळ काढणे, पाझर तलावातील गाळ काढणे, भूमिगत प्लास्टिक बंधारा बांधणे, कृत्रिम विहीर पुनर्भरण करणे, शेततळयातील गाळ काढणे, वाळूच्या गोण्या दाबून चेकडॅम बनविणे, भूमिगत प्लास्टिक बंधारे बांधणे असे उपक्रम हाती घेण्यात आले.

सलग 15 वर्षे अखंडितपणे हि योजना सुरु आहे. यामुळे मलकापूर शहरातील नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो. 24X7 नळ पाणी पुरवठा योजनेस वर्ष 2011 चा नॅशनल अर्बन वॉटर ॲवार्ड व पंतप्रधान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.