मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी नागपुरात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशमुख यांच्या प्रवेशामुळे भाजपला विदर्भात आक्रमक शिलेदार मिळाला आहे.
आशिष देशमुख यांनी भाजपा प्रवेशाआधी शनिवारी (१७ जून) केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती. यावेळी ते म्हटले होते, “मी कुठल्याही पदाची मागणी केली नाही. मी कार्यकर्ता म्हणून आणि पक्ष जी जबाबदारी देईल ते करत राहणार आहे. श्रद्धा आणि सबुरीनेच माझी पुढील राजकीय वाटचाल राहील. माझी राजकीय वाटचाल कोण्या एका मतदारसंघासाठी केली नाही. विदर्भाच्या हितासाठी मी काम करणार आहे.”
आशिष देशमुख म्हणाले, मी आमदाराकीसाठी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मी येणारी विधानसभा व लोकसभा निवडणूकही लढणार नाही. या निवडणुकांमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करेल. विदर्भातील नानागिरी संपवल्याशिवाय मी राहणार नाही, असा टोला आशिष देशमुख यांनी लगावला. देशमुख म्हणाले, देवेंद्र फडणवीस विधानसभा, लोकसभेसाठी जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल. २००९ मध्ये नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष असताना माझा प्रवेश भाजपामध्ये झाला होता. पश्चिम नागपूरमधून मला उमेदवारी देऊ केली होती. नितीन गडकरी माझ्यासाठी पितृतुल्य आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. पक्षातील पुढील वाटचाल संयमाने श्रद्धा आणि सबुरीने राहणार आहे. असं देशमुख म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली होती. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले होते. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. तेच देशमुख यांच्या अंगलट आले होते.
