देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झालेली आहे अशी बोचरी टीका आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. तसंच शिंदे गटावर आणि एकनाथ शिंदेवरही त्यांनी कडाडून टीका केली. या सगळ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना कुठे आग होते आहे हे आम्हाला माहित आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मोदी @९ या कार्यक्रमात भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोले लगावले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं की, मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसना, मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊं. मी परत तर आलोच शिंदेजींना देखील परत घेऊन आलो आहे.” फडणवीस म्हणाले की, ”मागचं सरकार हे, हे घरी बसणारं सरकार होतं. हे मी म्हणत नाही. मी म्हटलं असत तर ते राजकीय झालं असतं.” ते म्हणाले, शरद पवार यांनी आत्मचरित्र लिहिलं. त्यात ते म्हटले आहे की, आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षात केवळ दोन दिवस मंत्रालयात गेले. त्यामुळे आमचं नुकसान झालं.”
देवेंद्र फडणवीसांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंना कशी कशी आणि कुठे कुठे आग होते हे तुम्हाला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, पण आम्हाला समजतंय, असं फडणवीस म्हणाले. 2019 ला भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे खुर्चीच्या मोहामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले, तेव्हा मी पुन्हा येईल बोललो होतो आणि पुन्हा आलो. सोबत एकनाथ शिंदेंना देखील घेऊन आलो, असं फडणवीस म्हणाले. “आज मोदीजींविषयी आणि अमित शाह यांच्याविषयी उद्धव ठाकरे काय काय बडबडले? मला यांना म्हणावसं वाटतं की कोण होतास तू काय झालास तू? अरे वेड्या कसा वाया गेलास तू?” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाहीत, पण औरंगजेब आमचा नेता, राजा कसा होऊ शकतो. आमचा राजा एकच तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्याशिवाय आमचा दुसरा राजा होऊ शकत नाही. भारतातील मुसलमान आहेत तेही औरंगजेबाचे वंशज नाहीत. औरंगजेबाचं खाणदान बाहेरून आलेलं आहे. त्यामुळे देशातील राष्ट्रीय विचारांचा मुसलमान कधीच औरंगजेबाला मान्यता देत नाही. मग आज बाळासाहेब तुम्ही का तिथं जाऊन औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन करता असेही देवेंद्र फणडणीस यावेळी म्हणाले.
“उद्धव ठाकरेंचं भाषण लिहिणारे जे कुणी स्क्रिप्ट रायटर होते ते देखील बहुदा शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून उधारीवर त्यांनी स्क्रिप्ट रायटर आणले आहेत. आज म्हणाले देवेंद्र फडणवीसांची अवस्था अशी आहे की सहनही होत नाही की सांगता येत नाही. उद्धवजी तुम्हाला कुठे, कुठे आग होते आहे हे तुम्हाला सांगताही येत नाही आणि सहन होत नाही. आम्हाला ते माहित आहे. कुठे , कुठे कशी आग होते आहे.”
