नाना पटोलेंना काँग्रेस महासचिवांचा दणका; ‘त्या’ आदेशाला थेट दिल्लीतून स्थगिती

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस महासचिवांनी धक्का दिला आहे. चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यावरील कारवाईला स्थगिती दिली आहे. पटोलेंनी देवतळेंना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवलं होतं. या कारवाईला काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडून स्थगिती देण्यात आली आहे.

चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून हटवलं होतं. या कारवाईला काँग्रेसचे महासचिव वेणुगोपाल यांनी स्थगिती दिली आहे. पटोले यांच्यासाठी हा मोठा दणका मानला जातोय, तर पटोलेंचे पक्षांतर्गत विरोधक विजय वडेट्टीवार यांची सरशी झाली आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार आणि भाजपच्या पॅनलने हातमिळवणी करत खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनेलचा पराभव केला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती.

त्यानंतर लगेच राजुराचे आमदार सुभाष धोटे यांची चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली. दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यमुक्तीच्या आदेशाला स्थगिती दिल्याचा दावा कार्यमुक्त जिल्हाध्यक्ष देवतळे यांनी केला आहे. यासंदर्भात अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून आपल्याला स्थगितीचे पत्र देखील मिळाले आहे असे देवतळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.

प्रकाश देवतळे सलग नऊ वर्षे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. देवतळे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार गटाचे आहेत. वडेट्टीवार यांच्या आशिर्वादामुळेच देवतळे सलग नऊ वर्षे जिल्हाध्यक्ष होते. आता प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी राजुराचे आमदार धोटे यांच्या नियुक्तीनंतर पुन्हा देवतळे प्रभारी जिल्हाध्यक्ष पदासाठी हालचाली करित आहेत.