मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. आता अजित पवार यांनी स्वत: पक्षातील जबाबदारी मिळावी आणि विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान,आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे. विरोधी पक्षनेते पदाची मोठी जबाबदारी असताना, या पदावर काम करायचं नाही, असं अजित पवार म्हणतायत, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट होतेय, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. आम्ही सत्ताधारी असून आम्हाला अजित पवार यांच्यावर होणारा अन्याय पाहावत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी आग्रह केला. म्हणून मी ती जबाबदारी घेतली. मी एक वर्ष विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सांभाळत असताना काहींचे म्हणणे आहे की, तू कडक वागत नाही. आता त्यांची गचंडी धरु का? पण आता बस झाले. मला विरोधी पक्ष नेतेपदावरून मुक्त करा, संघटनेत कोणतेही पद द्या. मग कशापद्धतीने पक्ष चालतो ते बघा. तुम्हाला जे पद योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला योग्य न्याय मिळवून देईन, असे अजित पवार यांनी म्हंटले होते.
